पुणे: वाघोलीत पकडल्या मोठ्या वीज चोऱ्या दोन घटनेत एक कोटी 44 लाखाची वीजचोरी उघडकीस

पुणे, 20 डिसेंबर 2022 : महावितरणच्या भरारी पथकाने नुकतेच वाघोली येथे धाड टाकून एक कोटी 44 लाख व 58 हजार रुपयांच्या दोन वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून वीज चोरट्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे ग्रामीण भागातील वाघोली परिसरात भरारी पथकाने धाड टाकुन मे रोहन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाचा 103 एच.पी जोडभार असतांना त्यांनी ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधुन अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने चार लाख 25 हजार 72 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 74 लाख, 88 हजार 670 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत वाघोली परिसरातील मे. पृथ्वीराज एन्टरप्रायजेस स्टोन क्रशरने वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. सदर 95 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाने ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधुन अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. या ग्राहकाने तीन लाख 55 हजार 354 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून यासाठी त्याला 69 लाख 67 हजार 500 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

या दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 कलम 135 अन्वये लोणीकंद पोलिस स्टेशन येथे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता विशाल कोष्टी, सहा. सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सोनाली बावस्कर व तंत्रज्ञ पवन चव्हाण यांनी मोहिम यशस्वी केली.