कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्यावी :आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, २ जुलै २०२१: महाविद्यालयीन शिक्षण लवकरात लवकर सुरू होण्यासाठी कर्नाटक सरकारचा फॉर्म्युला वापरून कॉलेज विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोविड प्रतिबंधक लस द्यावी अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राज्य सरकारला केली आहे.

विद्यार्थी लसीकरणासाठी पेड लसीकरण केले तरी चालू शकते, कर्नाटक सरकारने असा निर्णय घेतला आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रात्यक्षिक करणे, लॅबमध्ये येणे अत्यावश्यक आहे, त्या कोर्स, महाविद्यालयांना लसीकरणात प्राधान्य द्यावे, असे आमदार शिरोळे यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी झालेल्या कोविड आढावा बैठकीत सांगितले.

सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, व्यावसायिकांना वीजबिलाचे हप्ते बांधून द्यावेत, कोविड संबंधी चुकीचे अहवाल देणाऱ्या लॉबवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.

शहरात मायक्रोकन्टेन्मेन्ट झोन पाडले त्याच धर्तीवर ग्रामीण भागात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट पाहून तालुकानिहाय वर्गवारी करून निर्बंध लावावेत, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.