उपमहापौर हिराबाई घुले यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी

पिंपरी, 10 जुलै 2021: संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांच्या पुढाकाराने बोपखेलमधील व्यापा-यांची त्यांच्या दुकानावर जाऊन कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली.  आज (शनिवारी) 289 व्यापा-यांची चाचणी केली. त्यामध्ये 1 जणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. दर 15 दिवसांनी व्यापा-यांची चाचणी केली जाणार असल्याचे उपमहापौर घुले यांनी सांगितले.
भोसरी रुग्णालयातील डॉ. शिल्पा जैन, रोशनी वानखेडे, अर्चना कांबळे, कोमल लोंढे, शेखर राऊत, आनंदा नानेकर, बाळासाहेब कार्ले, आदित्य शिंदे यांच्या टीमने बोपखेलमधील व्यापा-यांची कोरोना चाचणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते.
उपमहापौर घुले म्हणाल्या, ”शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी, आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले या अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांचा दररोज विविध नागरिकांशी संपर्क येतो. एखादा व्यापारी पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या दुकानात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी ‘सुपर स्प्रेडर्स’ होऊ शकतात. त्यामुळे व्यापा-यांची नियमितपणे दर 15 दिवसाला चाचणी केली जाणार आहे”.
”मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची अँटिजेन चाचणी केली जाते. बोपखेल भागातील 289 व्यापा-यांची चाचणी केली. त्यामध्ये 1 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना उपचाराचा सल्ला दिला. दर 15 दिवसांनी व्यापा-यांची चाचणी केली जाणार आहे. यामुळे कोरोनाचे तत्काळ निदान होऊन योग्यवेळी उपचार मिळतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल आणि कोरोनाचा प्रसार नियंत्रणात रहाण्यासाठी मदत होईल”, असेही उपमहापौर घुले म्हणाल्या.