पुणे: हनीट्रॅपद्वारे बांधकाम व्यावसायिकाला लुटले, कोंढवा पोलिसांनी केला टोळीचा पर्दापाश

पुणे, १६/०८/२०२१: इन्स्टाग्रामवर व्यावसायिकासोबत ओळख वाढवून हनीट्रॅपद्वारे जाळ्यात अडकवून ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केले.

रवींद्र भगवान बदर वय २६, रा. भिगवण, इंदापूर, सचिन वासुदेव भातुलकर , रा. येवलेवाडी, आण्णा राजेंद्र साळुंके, रा. भाट निमगाव, इंदापूर, अमोल साहेबराव ढवळे वय ३२, रा. बाणेर , मंथन शिवाजी पवार वय २४, रा. इंदापूर, प्रगती (नाव बदलले आहे, वय १९, रा. येवलेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. नितीन पवार रा. न्यू पनवेल, रायगड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी नितीन बांधकाम व्यावसायिक असून पनवेलमध्ये राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी प्रगती यांनी प्रगती नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते उघडून नितीन यांच्यासोबत ओळख वाढविली. त्यानंतर प्रगतीने नितीन यांना येवलेवाडी येथे फ्लॅटवर बोलावले. त्याठिकाणी जवळीक वाढवून शरीरसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. त्यानंतर नितीन तेथून जाण्याची तयारी करीत होते.

त्यावेळी प्रगतीने इतर आरोपींना बोलावून नितीन यांना मारहाण केली. बलात्कार केल्याची तक्रार देते असे सांगून आरोपींनी नितीन यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५ लाख रुपये देण्याचे नितीन यांनी मान्य केले.

त्यानुसार आरोपींनी त्यांच्याकडून ५०हजार रोख आणि ३० हजार रुपये असे मिळून ८० हजार रुपये जबरदस्तीने घेतले. त्याशिवाय प्रगती यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे लिहून घेतले. आरोपी बोपदेव घाटात असल्याची माहिती गणेश चिंचकर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे,योगेश कुंभार, महेश राठोड,अभिजित रत्नपारखी यांनी आरोपींना अटक केली.