पुणे: शहरातील विविध भागात घरफोडी, चार घटनांमध्ये साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

पुणे, ११/०८/२०२१: शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोड्या करून साडेपाच लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर, अलंकार, लोणीकंद व कोंढवा पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी बंगला क्रमांक ८०६ मधील एका बंद फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून सोन्याचे दागिने, आठ हजारांची रोकड व जरीच्या ३५ साड्या असा १ लाख ८३ हजार रूपयांचा ऐेवज चोरून नेल. याप्रकरणी प्रविण राम नाईक (वय ५६ ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रवीण कामानिमित्त त्यांच्या पिंपरी येथील घरी सध्या वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचे शिवाजीनगर येथील राहते घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत चोरी केली. तक्रारदार हे घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे समजले.

केसनंद गावातील वाघोली केसनंद रस्त्यावरील ओम स्मार्ट नावाच्या कपडे आणि खेळणी विक्रीच्या दुकानात घरफोडीचा प्रकार दोन दिवसापुर्वी घडला. यावेळी चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोकड व कपडे असा १ लाख ९० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत अतुल रामदास हराळ (वय ३५) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हांडेवाडी रोड आनंदनगर येथील राजवंती आबासाहेब कुरूंदवाडकर (वय ६० ) यांचा बंद फ्लॅटच्या खडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्या बेडरूमच्या कपाटातील २५ हजार रूपयांची रोकड व साडेचार तोळे सोन्याचे दागिणे असा पावणे दोन लाखाचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय डहाणुकर कॉलनीत फ्लॅट फोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मात्र, या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी वदीष उदय पराडकर (वय ३४, रा. मंत्री पार्क, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.