पुणे: कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांचे संगोपन सुरु – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २४ मे २०२१: जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले. या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची माहिती संकलित करून त्यांची योग्य काळजी आणि संगोपन घेतले जावे, यासाठी राज्य महिला आणि बालविकास आयोगातर्फे जिल्हास्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या टास्क फोर्सच्या माध्यमातून होत आहे.

यासाठी करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या आणि कोविडमुळे दोन्ही पालक उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ बालकांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा बालकांबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्प लाईन १०९८ ही २४ तास सुरु असून ८३०८९९२२२२, ७४०००१५५१८ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहतील.

अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी २९/२ गुलमर्ग को. ऑप. हौसिंग सोसायटी, सोमवार पेठ, पुणे ४११०११ आणि अध्यक्ष, बाल कल्याण समिती क्रमांक १ व २ पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र परिसर, गोल्फ क्लब रोड येरवडा, पुणे ४११००६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.