पुणे: ८८ लाखांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भूमी अभिलेखचा सेवानिवृत्त उपसंचालक आणि त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, १४ मे 2021- बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे माजी उपसंचालक आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात  मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याच्याकडे ८८ लाख ८५ हजार रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.
याप्रकरणी बाळासाहेब वानखेडे (वय ५८) आणि पत्नी उषाकिरण बाळासाहेब वानखेडे (वय ५४) याच्या विरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात भुमी अभिलेख विभागाचे उपसंचालक असताना बाळासाहेब वानखेडे यांना अटक केली होती. त्यानंतर वानखेडे यांच्या मालमत्तेची चौकशी केली जात होती. चौकशीत १९८९ ते २०१९ या दरम्यान वानखेडे  यांच्याकडे उत्पनापेक्षा ८८ लाख ८५ हजार रूपयांची मालमत्ता जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार वानखडे व त्याच्या पत्नीविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे हे सध्या सेवानिवृत्त असून त्याच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या पुणे शहर, मुंबई, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील मालमत्ता व घरांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्याची प्रक्रिया सूरू आहे. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार तपास करत आहेत.