September 12, 2025

पुणे: अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे नोंदवणार अनधिकृत होर्डिंग प्रकरणे : पीएमआरडीए महानगर आयुक्तांची कठोर भूमिका

पुणे, २२ मे २०२५: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील सर्वेक्षणात तब्बल ९६७ अनधिकृत होर्डिंग असल्याचे उघड झाले असून, त्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईस विरोध करणाऱ्या अथवा अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार, असा इशारा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिला आहे.

गुरुवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत डॉ. म्हसे यांनी अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत सुमारे ९० होर्डिंग काढण्यात आले असून, उर्वरितांवर २६ मेपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित होर्डिंग दोन महिन्यांत हटवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचाही आदेश यावेळी देण्यात आला.

पावसाळा लक्षात घेता नालेसफाईला प्राधान्य देण्यात येणार असून, प्रवाहात अडथळा आणणारा राडारोडा त्वरित हटवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

हानी झाल्यास गुन्हा नोंदवणार अनधिकृत होर्डिंगमुळे जीवितहानी किंवा इतर अपघात झाल्यास, जागामालक आणि जाहिरात एजन्सीवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सणसवाडी आणि भुकूम येथे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.

या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे, डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सह नियोजनकार श्वेता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्यासह संबंधित एजन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.