पुणे: पाषाण-बाणेर टेकडीफोड सुरू केल्याने नागरिक आक्रमक, महापालिकेचा केला निषेध

पुणे, ११ डिसेंबर २०२२ः पाषाण-बाणेर टेकडी फोडून रस्ता करण्याचा घाट पुणे महापालिका घालत आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने हे काम गेले एक वर्ष बंद पडले होते. मात्र पुन्हा एकदा खासगी बिल्डरांच्या हितासाठी महापालिकेने टेकडी फोडण्यास सुरवात केली आहे. यास विरोध करण्यासाठी आज शेकडो नागरिक टेकडीवर एकत्र येऊन महापालिकेचा निषेध केला. हे काम होऊ देणार नाही असे सांगत आक्रमक भूमिका घेण्याचे निश्चित केले.

 

पाषाण-बाणेर टेकडी बचाव नागरिक कृती समितीतर्फे आज रविवारी नागरिकांना टेकडीफोड भागात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. सर्व पक्षीय मंडळी, विविध सामाजिक संघटना व पाषाण, बाणेर, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, बावधन, सुस व म्हाळुंगे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाषाण-बाणेर टेकडी स्मार्ट सिटीने २०१९ मध्ये व्हेनेझिया सोसायटी हायवे ते पॅनकार्ड क्लब बाणेर भागात अंदाजे ३० ते ३५ फूट उंच व १०० मीटर लांब फोडली. नागरिकांनी त्यावेळेस त्यावर आक्षेप नोंदवला. जुलै २०१९ मध्ये या प्रश्नावर औंध येथील पंडीत भिमसेन जोशी नाट्यगृहात स्मार्ट सिटी, पुणे मनपा, मनपा लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. यात तत्कालीन स्मार्ट सीटी सीईओ राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटी इंजिनियर यांनी टेकडी चुकीने फोडल्या गेली, टेकडीफोड ही चूक झाली हे सर्वांसमोर मान्य केले. स्मार्ट सिटी व पुणे मनपा यांनी याच बैठकीत २० जुलै २०१९ रोजी नागरिकांना आश्वस्त केले की टेकडी फोड ही चूक झाली, यापुढे टेकडी सोडून रस्ता करणार टेकडीला हात लावणार नाही.

नागरिकांनी त्यावेळेस त्यांचेवर विश्वास ठेवला व फोडलेली टेकडी पूर्ववत करा अशी मागणी केली.

टेकडी भविष्यात सुरक्षित राहावी यासाठी स्मार्ट सिटी मुख्याधिकारी व पुणे मनपा आयुक्त, तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अश्या आशयाचे सहा हजार नागरिकांच्या सह्याचे निवेदनही दिले.

 

मध्यंतरी टेकडीफोड भागात काही लोक राडारोडा टाकत होते त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाली. पुणे मनपाने ट्रॅप लावून राडारोडा टाकणाऱ्यांची वाहने जप्त केली व दंडही वसूल केला. टेकडी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे मनपाच्या या कारवाई बद्दल धन्यवाद.

 

परंतु दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी याच भागात पुन्हा टेकडीफोड करून रस्त्याचे काम सुरू झाले. हे नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारे आहे. कुंपणच शेत खाते हेच म्हणावे लागेल. बाजूच्या विकसकांची एक इंचही जागा न घेता टेकडीवर घाला का? हे काम त्वरित थांबवण्यात यावे व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, राडारोडा टाकत अतिक्रमण करणाऱ्यांवर केली तशी. ही मागणी करत नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. २०१५ च्या शासकीय आदेशानुसार बिडीपी भागात टेकडीला कुठलीही इजा न पोहचवता टेकडीलगत मनपा आयुक्तांच्या परवानगीने फक्त ९ मीटर रस्ता करता येऊ शकतो. त्यासाठी डोंगत उताराची जागा १५ वर्षाआधीच घेतली असून काही अंतर ९ मिटर रस्तापण मागेच केलेला आहे. असे असताना इथे टेकडीफोड करत १८ मीटर रस्ता का व कोणासाठी? स्थानिक नागरिकांनी सुद्धा टेकडीफोड न करता असलेल्या जागेत ९ मीटर रस्ता करावा हेच सांगितले. कुणाचीही मागणी नसताना बिडीपी भागात टेकडीफोड करून इतका मोठा रस्ता कुणाच्या फायद्यासाठी हाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बाणेर बाजूची टेकडी यासाठी फक्त बिल्डरांना फायदा पोहचवण्यासाठी जागोजागी फोडली जाणार हे स्पष्टच दिसते.

श्री. व्ही. जी. कुलकर्णी पुणे मनपा पथ विभाग मुख्य व संबंधित अधिकाऱ्यांना टेकडीफोड भागात नागरिकांशी चर्चा करून मार्ग काढावा म्हणून आज बोलाविण्यात आले होते परंतु त्यांनी त्याकडे पाठ फिरवली.

 

नागरिकांनी पाषाण-बाणेर टेकडी संदर्भात खालील मागण्या केल्या व तश्या आशयाचे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पुणे मनपा आयुक्त यांनाही देण्यात येणार आहे.

 

बेंगलुरू, हैद्राबाद, चेन्नई येथील जलस्त्रोत व निसर्ग संपवल्यामुळे झालेली वाताहत ताजी असताना, मुंबई व इतरत्र होणाऱ्या दरड कोसळी, सप्टेंबर २०१९ ला पुण्यात आंबील ओढ्यावरील अतिक्रमणामुळे ५० पेक्षा जास्त लोकांचे घेतलेले जीव हे सर्व ताजे असताना ही टेकडीफोड का? भविष्यातील माळीण व जीवितहानी टाळण्यासाठी गरज पडल्यास मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊ पण टेकडीला हात लावू देणार नाही ही ठाम भूमिका घेण्यात आली. प्रकाश दांडेकर, गौरव फडणवीस, राहुल कोकाटे, मधुकर दळवी, दीपक श्रोते, मोनाली शाह, यामिनी राठी, प्रल्हाद सायकर, अनिकेत मुरकुटे, आशिष कटके, मोहन हिंगडे, संजीव नाईक, सुरेश ससार, गोविंद भोईटे आदींनी आपली मते मांडली व पाषाण टेकडीला यापुढे कुठलीही इजा पोहचवली तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल व प्रसंगी न्यायालयीन लढाई पण लढावी लागली तर तेही केल्या जाईल, आमच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही देण्यात आला.