साक्षी शिंदे
पुणे, १६ ऑक्टोबर २०२२: वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे कात्रज कोंढवा परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत पण प्रशासनाकडून मात्र त्याकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज रविवारी सुट्टीचा दिवस गाठून पुणे महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. गंगाधाम ते शत्रुंजय मंदिर रस्त्याचे काम करावे या मागणीसाठीसाठी कोंढवा डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून नागरिकांनी आई माता मंदिराजवळ आंदोलन केले.
दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोंढवा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रंचड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर अनेकदा तक्रार करून देखील महापालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे, महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पांढरे कपडे परिधान करून, कळ्या रिबीन बांधल्या होत्या.
या आंदोलनामध्ये “रोड झालाच पाहिजे,वाहतूक कोंडी सुटलीच पाहिजे”, “झोपलेल्या प्रशासनाचा धिक्कार असो”, “आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा”, “नो रोड, नो टॅक्स.” अश्या घोषणा करत आईमाता मंदिर ते गंगाधाम चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. रस्त्यावरून येणा-जाणाऱ्या लोकांना, “बघताय काय, सामील व्हा” असे म्हणून आंदोलनात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.
या हद्दीमध्ये जड वाहनांना सक्त बंदी करावी, हेल्पलाईन नंबर द्यावा; जेणेकरून अपघात झाल्यास लगेच मदत मिळेल, रस्ता दुभाजक करून, रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे. अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या.
या रस्त्यावर जड वाहनांना पुर्णतः बंदी असून देखील वाहने जातात, यामुळे वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे एका संतप्त आंदोलकाने सांगितले.
आंदोलनात सामील झालेल्या आणखी एका आंदोलकाने सांगितले, आमचा कोंढवा डेव्हलपमेंट फोरम म्हणून ग्रुप आहे, जेथे आम्ही सर्व समस्यांची चर्चा करून अधिकृतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. ” गेल्या सहा महन्यांपासून आम्ही यावर कायदेशीर रित्या मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत; परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. म्हणून आम्ही आंदोलन करण्याचा पर्याय निवडला.”
सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब मुऱ्हे म्हणाले, मी माझ्यापरीने वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहे. यावर आता कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा