October 7, 2025

पुणे शहराला मिळाला पथारी व्यावसायिकांसाठीचा पहिला सुनियोजित हॉकर्स पार्क

पुणे, दि. ७ ऑगस्ट, २०२५ : एक आदर्श ठरू शकेल असा पथारी व्यावसायिकांसाठी असलेला पहिला सुनियोजित असा हॉकर्स पार्क ‘नुक्कड’ आता पुणे शहराला मिळाला आहे. पुण्यातील पंचशील फाउंडेशनच्या संकल्पनेतून याची निर्मिती करण्यात आली असून खराडी येथील सर्व्हे क्रमांक १, फाऊंटन रस्ता, वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ सदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी आज झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पंचशीलचे अतुल चोरडिया यांनी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना सदर प्रकल्प हस्तांतरित केला. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.

नुक्कड हॉकर्स पार्क हे तब्बल ८६ हजार चौरस फूट जागेत पसरलेले असून विक्रेत्यांसाठी ते एक समर्पित विक्री क्षेत्र आहे असे म्हणता येईल. या प्रकल्पामध्ये १२० युनिट्स आहेत ज्यात फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी ५० ओटे, इतर आवश्यक सामानांच्या खरेदीसाठी ५० युनिट्स आणि बेकरी, सलून, कार- सायकल दुरुस्ती, कुलूप दुरुस्ती, कार वॉश यांसारख्या आवश्यक सेवा यांसोबतच भाज्यांसाठी पोटॅशियम धुण्याचे वेगेळी जागा अशा सेवांसाठी २० युनिट्स यांचा समावेश आहेत. या जागेत फुलविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते आणि फूड ट्रकसाठी कंटेनर देखील आहेत. नुक्कडमध्ये प्रसाधन गृह, ५० चार चाकी व १५० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील विक्री युनिट्स टाकून दिलेल्या शिपिंग कंटेनरचा पुनर्वापर करीत बनवले गेले असून पर्यावरण-जागरूक डिझाइनचा वापर यामध्ये करण्यात आला आहे हे विशेष.

याप्रसंगी बोलताना पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, “पुण्यात सुमारे १२ हजार परवानाधारक पथारी व्यावसायिक आहेत. पथारी व्यावसायिक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असतात. परंतु आजवर म्हणावे तसे लक्ष त्यांच्याकडे दिले गेलेले नाही. अशा प्रकारच्या पथारी व्यावसायिकांसाठी त्यांना आवश्यक सुविधा व सुयोग्य वातावरण मिळण्यासाठी त्यांचे प्रमाणीकरण गरजेचे आहे. ‘नुक्कड’ सारखे प्रकल्प यादृष्टीने नक्कीच महत्वाचे ठरतील. अशा प्रकल्पांमध्ये दिव्यांग व ट्रान्सजेन्डर व्यक्तींना कसे सामावून घेता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे. नजीकच्या भविष्यात नुक्कड सारखे आणखी प्रकल्प शहरात उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

वडगाव शेरी भागाचे आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत खराडीचा विकास वेगाने होत आहे आणि अशा प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधांमध्ये मोलाची भर पडेल. सर्वसमावेशक प्रयत्नांच्या माध्यमातून खराडीला एक आदर्श उपनगर म्हणून विकसित करण्यावर आमचा भर असून यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू. सीएसआरद्वारे खराडीमध्ये राखीव जमिनीच्या विकासासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू.”

पंचशीलचे अतुल चोरडिया म्हणाले, “सीएसआर उपक्रमांमधून नुक्कड हा प्रकल्प विकसित करून आम्ही सर्वांसमोर एक यशस्वी उदाहरण ठेवत आहोत. पुणे शहरातील विविध ठिकाणी महानगरपालिका या प्रकल्पाचे अनुकरण करू शकते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आज सुमारे २२०० भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत असून अशा काही भूखंडांचा वापर नुक्कड सारख्या संकल्पनांसाठी नक्कीच करता येईल.”

शहरातील एक महत्वाचे आयटी हब म्हणून उदयास येत असलेल्या खराडीमुळे तब्बल ३ लाख नागरिकांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय अप्रत्यक्षपणे तब्बल तीन पट नागरिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या भागाच्या सध्याच्या आणि नजीकच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मेट्रो कनेक्टिव्हिटीची निश्चितच आवश्यकता आहे. जर महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला जमीन देण्यात आली तर आम्ही आमच्या सीएसआरद्वारे खराडीमध्ये खेळाचे मैदान आणि सार्वजनिक उद्यान विकसित करू. पुढील ३ वर्षे पंचशील फाउंडेशनच्या वतीने नुक्कडची देखभाल करण्यात येईल, अशी माहितीही चोरडिया यांनी दिली.

नुक्कड या प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी –

नुक्कड ही एक विचारपूर्वक नियोजित व डिझाइन केलेली सार्वजनिक जागा असून याद्वारे लहान विक्रेत्यांना काम करण्यासाठी एक स्वच्छ, सुनियोजित आणि व्यापारास अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यात येते. रस्त्यावरील अनौपचारिक खरेदीचा आनंद देणारी ही जागा शहरी व्यवस्थेत पथारी व्यावसायिकांना परवडणाऱ्या पद्धतीने व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देते. येथील विक्री युनिट्स टाकून दिलेल्या शिपिंग कंटेनरचा पुनर्वापर करीत बनवले गेले असून पर्यावरण-जागरूक डिझाइनचा वापर यामध्ये करण्यात आला आहे हे विशेष.

शहरातील खराडीसारख्या व्यावसायिक व आयटी हबमध्ये रुपांतरीत होत असलेल्या प्रमुख भागांमध्ये लहान विक्रेत्यांसाठीच्या जागांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. समाजाच्या परिसंस्थेत फेरीवाले, पथारीवाले यांचे असलेले स्थान लक्षात घेता शहरात नियोजनबद्ध सार्वजनिक जागांचा अभाव अधोरेखित होत असताना पंचशील फाऊंडेशनच्या संकल्पनेतून नुक्कड पार्क ही संकल्पना मांडण्यात आली आहे.

या संकल्पने अंतर्गत स्थानिक विक्रेत्यांना वापरण्यास सोयीचे, सुसज्ज आणि स्वच्छ कार्यक्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर गर्दी कमी करून वाहतूक आणि सुरक्षितता सुधारणे, पादचाऱ्यांना अधिक चांगला अनुभव देणे हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. शिवाय अनधिकृत बांधकामांच्या वाढीला प्रतिबंधित करीत सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे कमी करण्यास देखील नुक्कड सारख्या प्रकल्पांमुळे मदत होईल.

शहरी विकासासाठीचा असलेला लोकाभिमुख दृष्टिकोन हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये असून इतर व्यावसायिक मॉल्स किंवा रस्त्यावरील तात्पुरत्या बाजारपेठांपेक्षा हा प्रकल्प वेगळा असेल. या ठिकाणी परिसरातील बाजारपेठेची पुनर्कल्पना करण्यात आली असून येथे स्थानिक विक्रेत्यांना एक हक्काची सुरक्षित आणि ग्राहकांना यावेसे वाटेल अशी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून याद्वारे समाजामध्ये एक सकारात्मक नातेसंबंध तयार होण्यास मदत होईल. शहराच्या इतर वाढत्या भागांसाठी एक सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध प्रतिकृती म्हणून हे उदाहरण काम करेल.