पुणे महापालिकेला झटका, रोज १० लाखाचे दंड वसूलीचे आदेश मागे घेण्याची महापौरांची सूचना

पुणे, २८/०८/२०२१: सोशल डिस्टन्स न पाळणार्यांवर, मास्क न घालणार्यांवर कारवाई करून रोज १० लाखाचा दंड वसूल करण्याचा आदेश महापालिकेच्या अंगलट आला. हा फतवा मागे घेण्याचा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

महापालिकेच्या अपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी हे आदेश काढले असल्याने खळबळ उडाली आहे. त्याची पुणेकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे. तसेच आदेश काढणारे माधव जगताप यांना खुलासा मागविण्यात आला असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पुण्यात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुख्य बाजारपेठेसह गल्लीबोळातील दुकाने, हातगाड्या, खाद्य पदार्थ्यांचे, चहाचे स्टॉल या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. असे असले तरी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने, तसेच अनेकजण मास्क न घालताच फिरत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. अशांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कर्मचारी नेमले असून, त्यांच्याकडून काही प्रमाणात कारवाई सुर आहे. मात्र, आता माधव जगताप यांनी काढलेल्या आदेशामुळे प्रशासनाचे देखील धाबे दणाणले आहेत.

रोज १० लाख रुपयांचा दंड वसूल करायचा म्हणजे बंदुकीच्या धाकावर पैसे गोळा करण्याचै प्रकार आहे. महापालिकेने शिस्त लावावी पण पैशाचे टार्गेट देऊन कारवाई करणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, महापालिकेने अपत्ता व्यावस्थापन कायद्याचा आधार घेऊन या कारवाईचा आदेश क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. जर करावाई केली नाही तर कार्यात कसूरी ठेवल्याचे कारण देऊन कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

‘‘गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने व्यापारी, नागिरक बेजार झालेले आहेत. अशा वेळी टार्गेट देऊन कारवाई करणे म्हणजे दहशत परसविण्याचे काम आहे. महापालिका प्रशासन तालिबानी पद्धतीने काम करत आहे. अशा आदेशाचा सर्वाधिक त्रास हा व्यापाऱ्यांना होणार आहे, त्यामुळे आम्ही व्यवसाय करावेत की नाही हे एकदा प्रशासनाने स्पष्ट करून टाकावे. या आदेशाचे आम्ही जाहीर निषेध करतो, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.