पुणे: तक्रारदारांसाठी सायबर पोलिसांकडून हेल्पलाइन कार्यान्वित

पुणे, १२ जुलै २०२१: शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून गंडा घालत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष दूरध्वनी सुविधा (हेल्पलाईन) सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रारदारांनी अशा प्रकारांची माहिती त्वरित (गोल्डन हवर) सायबर पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. अनेकदा नागरिकांना तक्रार कोठे आणि कशी करायची, याची माहिती देखील नसते. सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्वरित चोरट्यांच्या खात्यात वळविली गेलेली रक्कम किंवा व्यवहार थांबविण्यासाठी संबंधित बँकेकडे तक्रार करता येणे शक्य होते, असे आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.

चोरट्याने एखादा व्यवहार केल्यास त्वरित त्याचे स्क्रीनशॉट, संदेश, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, लिंक मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर पाठविल्यास किंवा स्क्रीनशॉट पाठविल्यास ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले असतील, त्या बँकेबरोबर संपर्क साधण्यात येतो. तसेच चोरट्याने ज्या बँकेच्या खात्यात पैसे वळवले असतील, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणे शक्य होते. त्यामुळे सायबर चोरट्याने के लेल्या फसवणुकीला वेळीच आळा घालणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.

सायबर पोलिसांचे आवाहन

– मोबाइल क्लोन अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

– अनधिकृत लिंक उघडू नका. -मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका.

– ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्वरित सायबर पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

– कस्टमर केअर सेंटर’शी संपर्क साधताना संपर्क क्रमांक पडताळून घ्या.

सायबर पोलीस हेल्पलाइन

व्हॉटसअ‍ॅप क्रमांक- ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५

सायबर पोलीस ठाणे- ०२०-२९७१००९७

इमेल- crimecyber.pune@nic.in