पुणे, २३/१२/२०२३: नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नगर रस्त्यावर एनएचआयच्या माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनिल टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री संखे उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय अशा सूचना एनएच आयला करण्यात आले. तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश पालकमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
यावेळी रखडलेल्या शिवणे- खराडी रस्ताबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी सुचना पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिल्या. तसेच वडगाव शेरी विधान सभा मतदार संघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.
मेट्रो मार्गिका विमानतळापर्यंत करा – पवारांच्या सूचना
नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्याना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन