पुणे:’बाय बाय डिप्रेशन, गुड बाय गुड्डी’ असा मेसेज शेअर करीत प्राध्यापकाची आत्महत्या

पुणे,१४ जुलै २०२१- शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सासवडजवळील भिवरी गावात घडली आहे. आत्महत्येपुर्वी त्यांनी सोशल मीडियावर ‘बाय बाय डिप्रेशन, गुड बाय गुड्डी’, असा मेसेज पोस्ट करून जीव दिला. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव आहे.

 

मेश्राम कर्वेनगरमधील एका नामवंत शिक्षणसंस्थेत प्राध्यापक होते. त्यांनी मंगळवारी (१३ जुलै ) सोशल मीडियावर ‘बाय बाय डिप्रेशन, गुड बाय गुड्डी’, असा मजकूर टाकला. सासवडजवळ असलेल्या भिवरी गावातील विहिरीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्याला ही घटना दिसून आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. विहिरीच्या काठावर मेश्राम यांचे कपडे, मोबाइल , पाकिट, दुचाकीची चावी सापडली. सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.