पुणे: किरकोळ वादातून महाविद्यालयीन युवकांना बेदम मारहाण, तिघांच्या विरोधात गुन्हा

पुणे, ११/१२/२०२२: दिवाळीत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून महाविद्यालयीन युवकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलवंत बलवान सिंग (वय २१, सध्या रा. श्रीहरी हाइट, आंबेगाव पठार, धनकवडी) आणि हिमांशू मिश्रा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सम्राट वैद्य, हर्ष पटेल, सिद्धार्थ साहू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलवंत सिंग याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिवाळीत महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंग याचा वैद्य, पटेल, साहू यांच्याशी वाद झाला होता.

सिंग भारती विद्यापीठ परिसरातून रात्री निघाला होता. त्या वेळी आरोपींनी सिंग आणि त्याचा मित्र मिश्रा याला लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यांना बेसबाॅल स्टीकने बेदम मारहाण केली. मारहाणीत सिंग आणि मिश्रा जखमी झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक ढगे तपास करत आहेत.