पुणे: महाविद्यालयीन फी कमी व्हावी, यासाठी पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदविल्या तक्रारी

पुणे, १६ जून २०२१: युवक क्रांती दलातर्फे (युक्रांद) महाविद्यालयीन फी वादीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातंर्गत पाच हजार विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्मद्वारे महाविद्यालयीन फी कमी व्हावी, यासाठी तक्रार नोंदविली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मांडण्यासाठी दलातर्फे लवकरच याविषयी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

करोनामुळे विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. गेल्या एक वर्षापासून विदयार्थ्याचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर विदयार्थ्यांनी केला नाही, असे असूनही महाविद्यालयांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे. विद्यार्थ्यांनी फी भरावी यासाठी महाविद्यालये दबाव टाकत आहेत. फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करून घेणार नाही किंवा इंटर्नल परिक्षेला बसू देणार नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात आहे. फी भरणे शक्य नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची नामुष्की ओढवली आहे.मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दयावे. अन्यथा युवक क्रांती दलाकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दलातर्फे देण्यात आला आहे.