पुणे: महागाई विरोधात काँग्रेसची सायकल यात्रा, पण राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची दांडी

पुणे, ०८/०७/२०२१: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चूकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याविरोधात शहर काँग्रेसने सायकल यात्रा काढून भाजप सरकारचा निषेध केला. मात्र या  आंदोलनास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दांडी मारल्याने हा विषय चर्चचा ठरला आहे. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने कदम आंदोलनापासून दूर राहिले असल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसने गुरूवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत सायकल यात्रा काढली. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल यात्रेची सुरूवात झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अमीर शेख, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके, एनएसयूआयचे भुषण रानभरे, सेवादलाचे प्रकाश पवार व सेलचे प्रमुख या सायकल यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

कार्याध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठिण केले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. याउलट कर रूपाने करोडो रूपयांची लूट चालविली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकारने भरमसाठ कर लावून जनतेची लूट केली आहे. केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलवर लावलेल्या भरमसाट एक्साईज ड्युटीमुळे यांचे दर वाढलेले आहे. आज पेट्रोलचे दर १०६ रू. लिटर तर डिझेलचे दर ९६ रू. लिटर झालेले आहे. स्वयंपाक गॅसचे दर ८५० रूपयांच्यावर गेलेले आहे. खाद्यतेल आणि डाळींचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या महागाईमुळे आज जनता त्रस्त झालेली आहे. या महागाईकडे मोदी सरकारने त्वरीत लक्ष घालून सामान्य जनतेला दिलासा दिला पाहिजे. असे न केल्यास काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार.’’

शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की,‘‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महागाई विरोधात ८ ते १६ जुलै पर्यंत जनआंदोलन आयोजित केले आहे. यु. पी. ए. सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाचे भाव उच्चांक गाठलेला असताना सुध्दा पेट्रोल व डिझेलचे दर कमी होते. ते सामान्य जनतेला परवडणारे होते परंतु आज मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून एक नवा इतिहास केला आहे.”