पुणे: म्हैस मालकांविरूद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे, २६/०८/२०२१: पुण्यात एका म्हशीमुळे थेट मालकावर गुन्हा दाखल करण्याची वेळ लष्कर पोलिसांवर आली आहे. दोरखंडाने बांधून घेउन चाललेल्या म्हशीने मालकाच्या हाताला हिसका मारून दुचाकीस्वार पती-पत्नीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून जखमी झाल्यामुळे तिघा म्हैश मालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यसात आला आहे.

म्हैशीचे मालक शहनवाज अब्दुल रजाक कुरेशी,सदाकत कुरेशी आणि नदाफत कुरेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जुबेर अस्लम शेख (वय ३८, रा. निलकंठ विहार, कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादी जुबेर विमाननगरमध्ये एका कंपनीत मॅनेजर आहेत. ८ ऑगस्टला ते पत्नीसह एम.जी. रोड परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होेते. त्यावेळी पावणेचारच्या सुमारास समोरुन म्हशी येत असल्याने त्यांनी दुचाकी एकाबाजुला घेउन थांबले. त्यावेळी एका म्हशीने मालकाच्या हाताला झटका देवुन पळत काढत जुबेर व त्यांच्या पत्नीस जोरात धडक मारली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यामुळे जुबेर यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला जखम झाली. त्याशिवाय पत्नीस डाव्या हाताला मार लागला. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. म्हैसीचे मालक शहनवाज अब्दुल रजाक कुरेशी व सदाकत कुरेशी यांनी पुरेसा बंदोबस्त केला नाही. त्यामुळे म्हशीने धडक दिल्यामुळे शेख पती-पत्नी जखमी झाल्याचे तक्रारीद नमूद केले आहे. याप्रकरणी जुबेर यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. चौकशीनंतर लष्कर पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.