पुणे: तडीपार असतानाही शहरात दहशत पसरविणाऱ्या सराईताला अटक गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे, २५ जून २०२१: – तडीपार असताना आदेशाचा भंग करून शहरातील भवानी पेठेतील चुडामन तालीम येथे येऊन दहशत माजविणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केले आहे. अरबाज उर्फ बब्बन इक्बाल शेख (२३, रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. पोलीस अमंलदार अजय थोरात यांना सराईत अरबाज चुडामन तालीम येथे नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यात दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली.

गुन्हे शाखेचे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अरबाज पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून यावेळी प्राणघातक हत्यार जप्त करण्यात आले. त्याला ४ जोनवारीला पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले होते. मात्र तरीही शहरात येऊन दहशत माजवत असताना अरबाजला अटक करण्यात आली. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हत्यारानिशी दहशत निर्माण करणे, घरफोडी, खंडणी व चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमंलदार विजेसिंग वसावे, अजय थोरात, अशोक माने, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने केली.