पुणे: सोशल मीडियावर शस्त्राचा फोटो अपलोड करणे भोवले, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

 
पुणे, ०४/०७/२०२१: शस्त्र  घेऊन उभे असलेले व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करणे दोघांना भोवले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघा जणांना अटक केली आहे.  नितीन सुंदर दहीरे (वय २२) आणि अनिकेत अशोक कुंदर (वय २२, रा. दोघेही हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी पालघन व तलवार हातामध्ये घेऊन उभा असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला होता. त्यामुळे त्यांची परिसरात दहशत निर्माण झाली होती.


 सोशल मिडीयावर शस्त्रांचा फोटो अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे  दोघेजण हडपसरच्या हिंगणे मळा परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने नितीन आणि अनिकेत यांना अटक केली. त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कमल ४ (२५) व महाराष्ट्र पोलिस कलम कायदा ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय वाघोली येथील तरूणाने हातामध्ये पालघन घेऊन   व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यामुळे त्याची परिसरात दहशत निर्माण झाली होती.

संबंधित तरुण वाघोली गायरान झोपडपट्टी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती  माने यांनी दिली.