सराईत गुन्हेगाराकडून थेट भाजी विक्रेत्याकडेच खंडणीची मागणी

पुणे, ४/०७/२०२१:  रस्त्याच्याकडेला टेम्पोतून भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यास सराईत गुन्हेगाराने दोन हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. खंडणी न दिल्याने विक्रेत्यास बांबूने मारहाण करून गुन्हेगाराने त्याचा टेम्पोही फोडला. ही घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजता महमदवाडी रस्त्यावरील तरवडे वस्ती परिसरात घडली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वानवडी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या.
रोहन उर्फ गंजक्‍या मोहन कांबळे (वय 21, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी रस्ता) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हडपसर येथील एका 29 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
फिर्यादी तरुण हा हडपसर येथील तरवडे वस्ती परिसरामध्ये टेम्पोमध्येच भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करतो. गुरूवारी सायंकाळी ते टेम्पोतून भाजीपाला विक्री करीत होते. त्यावेळी आरोपी कांबळे तेथे आला. तो फिर्यादीकडे जबरदस्तीने दोनत हजार रुपयांची मागणी करू लागला. त्यावेळी विक्रेत्या तरुणाने त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने त्याला “”मी कोण आहे, माहित आहे काय, मी इथला भाई आहे. धंदा करायचा असेल तर दररोज पैसे द्यावे लागतील,” अशा शब्दात धमकी देत अशी खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्याने तरुणाला बांबूने मारहाण करीत टेम्पोला लावलेले प्लॅस्टीकचा कागद फाडून टाकला. टेम्पोमधील भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. यावेळी टेम्पोचे आठ हजार रुपयांचे आणि भाजीपाल्याचे चार हजार रूपये असे एकूण 12 हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेनंतर फिर्यादीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.पोलिसांनीही घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जयंत जाधव करीत आहेत.