पुणे: शहरातील धोकादायक भिंतीची तपासणी

पुणे, ४/०६/२०२१: पावसाळ्यात सीमा भितीं पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते, त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात ३०० ठिकाणी सर्वेक्षण करून तीन ठिकाणचे लेबर कॅम्प हलवले आहेत. तर सीमा भिंती धोकादायक झाल्याने चार मालाकांना नोटीस बजावली आहे.

शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, या ठिकाणी काम करणारे मजूर याच परिसरात सीमा भिंतीचा आधार घेऊन पत्र्याच्या शेडच्या घरांमध्ये राहात असतात. पावसाळ्यात या भिंती धोकादायक होऊन घरांवर पडतात. त्यात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. पुण्यात यापूर्वी अशा घटना घडून अनेक मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांचा झोपेतच मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहेत. याप्रकरणांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊन कारवाईला सामोरे जावे लागते.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या सर्वच भागातील सीमाभिंत, लेबर कॅम्प आहेत, अशा ठिकाणी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक परिमंडळातील अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत ३०० ठिकाणी पाहणी झाली आहे. यामध्ये धोकादायक ठिकाणी असलेल्या ३ लेबर कॅम्प हलविण्यात आले आहेत. तर ४ सीमाभिंत धोकादायक झाल्या असून, त्या काढून घेण्यासाठी संबंधित जागा मालकांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली.

धोकादायक वाडे पाडले
शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये अनेक जुने वाडे आहेत, पावसळ्यांमध्ये हे वाडे पडतात, त्याचे सर्वेक्षण करून महापालिकेने गेल्या एका महिन्यात ३३ वाडे पाडले आहेत. तसेच सध्या शहरात अत्यंत धोकादायक असे ५ वाडे आहेत. तर तत्काळ दुरुस्ती न केल्यास धोकादायक होऊ शकतील असे २११ वाडे आहेत, त्यापैकी १५० ठिकाणी दुरुस्ती झाली आहे. तर किरकोळ धोकादायक असलेल्या ११५ वाड्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.