पुणे: व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी बेड्या

पुणे,३०/११/२०२२: अत्यंत महाग असणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या व्हेल माशाची उलटीची किंमत तब्बल सव्वा पाच कोटी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पुण्यात ही टोळी नेमके कोणाला उलटी विकणार होते, याचा तपास केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या पाठिमागील बाजूस केली आहे.

राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), नवाज अब्दुला कुरुपकर (वय २४), अजिम महमुद काजी (वय ५०, दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६), अक्षय विजय ठणगे (वय २६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे व तपास पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे या हद्दीत गस्त घालत होत्या. यादरम्यान, व्हेल माशाची कोट्यवधी रुपयांची उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी कल्याणी पाडोळे यांना मिळाली होती.

  पथक आरोपींचा शोध घेत होते. यावेळी फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या मागील बाजूस ३ जण संशयास्पद उभे असल्याचे दिसले. लागलीच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता, व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. चौकशी केल्यानंतर त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. तसेच त्यांना मदत करण्यासाठी दोन जण आल्याचे सांगितले. विजय ठाणगे व अक्षय ठाणगे या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी राजेंद्र कोरडे याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये २ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळला. याची किंमत २ कोटी ९९ लाख ४० हजार रुपये आहे, तर नवाज कुरुपकर याच्या बॅगेतून २ कोटी २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा २ किलो २८६ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त केला आहे. तसेच विजय ठणगे याच्या ताब्यातून दुचाकी जप्त केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करीत आहेत.