पुणे, ता. ०८/०८/२०२३: पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक व सेवकांना सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. याबाबतचे निवेदन कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व उपायुक्त रवींद्र बिनवडे यांना दिले. आयुक्तांनी प्रशिक्षकांसाठी सकारात्मकता दर्शवत पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाज विकास विभाग अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. संपूर्ण भारतातील यशस्वी उपक्रम म्हणून याची नोंद झालेली आहे. झोपडपट्ट्यातील बेरोजगारी व अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या केंद्रामार्फत विविध तंत्रज्ञान व कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देते. २००१ सालापासून सुरू झालेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षक महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.
दि. ०१ जून २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय क्रमांक पीएमसी-२०२१/प्र.क्र.३७७. नवि-२२ यामध्ये १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. वरील शासन निर्णयासाठी लागणारा मुख्य ठराव क्र. ८५१ मध्ये विविध योजनांबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचाही महत्त्वांच्या बाबीत उल्लेख झाला आहे. मात्र, प्रशिक्षक व सेवक यांना या शासन निर्णयामध्ये समाविष्ट केले गेले नाही. या प्रशिक्षक व सेवकांवर अन्याय होऊ नये, तसेच त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे, अशी विनंती प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. यावेळी अनेक प्रशिक्षक उपस्थित होते.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?