पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ६०० भटक्या- विमुक्त कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप

पुणे, दि. २४ मे २०२१: मानव विकास संशोधन केंद्राच्या पुढाकाराने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील जवळपास ६०० कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. येत्या काही दिवसात या कुटुंबांसाठी ताडपत्री वितरण, किमान अर्थसहाय्य, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वैदू ,जोशी,डवरी गोसावी, तिलमारी,नंदीवाले,बहुरूपी, कैकाडी, नट, मदारी,ढोलकीवाले,वडार,पारधी ह्या भटक्या विमुक्त समाजातील जवळपास २००० व्यक्ती अर्थात ६०० कुटुंबे शहरात विविध भागांमध्ये पालावर वास्तव्य करून राहतात. त्यांच्या आजूबाजूला गोंड,आदिवासी, काही करंबे महार,मातंग समाजाची काही कुटुंबेही भाड्याने वास्तव्य करत आहेत. त्यानांही या कार्यात समाविष्ट करून घेण्यात आले.

अन्न,वस्त्र,निवारा ह्याकरीता एकूणच समाजावर अवलंबून असलेल्या ह्या समाजाकडे शासनाचे कुठलेही विशेष लक्ष नाही. लॉकडाऊन काळात कुठलीही पर्यायी सोय नाही. पालाचे भाडे थकलेले, पाणीही तीन रुपये किंवा पाच रुपये प्रति भांडे याप्रमाणे विकत घेवून वापरायचे अशा स्थितीत लोक येथे जगत आहेत. अशा गरजू कुटुंबाचा सर्व्हे मानव संशोधन विकास केंद्राद्वारे अध्यक्ष भालचंद्र सावंत व मार्गदर्शक विनायक लष्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यानुसार मदतीच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले.

या नागरिकांसाठी किराणा सामान उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे येथील अनुभूती संस्था व दीपा पवार, पुणे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असीम तांबोळी, समाजसेवक डॉ. महावीर साबळे, समाजसेविका मयुरी ढवळे, दिल्ली येथून डॉ आश्विनी जाधव, श्वेता गोस्वामी अंकित गुप्ता यांनी सहकार्य केले. आणखी काही कुटुंबाना मदत पोचविण्याचे नियोजन करण्यात येत असून याकामी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे सहकार्य मिळणार असल्याची माहिती केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक दयानंद कनकदंडे यांनी दिली.

संस्थेने सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आर्थिक मदत केली. या सर्व उपक्रमात हरिश्चंद्र सावंत,विष्णू अंबड आणि मोहिनी कारंडे यांनी महत्वाचे योगदान दिले.