गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये मतदार जनजागृतीसाठी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. 1: पुणे महानगराला गणेशोत्वाची मोठी परंपरा आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह पुणे जिल्हयातील गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमामध्ये मतदार जनजागृतीसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. स्वीप कार्यक्रमात गणेश मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश मंडळाचे अध्यक्ष व प्रतिनिधीसोबत स्वीप कार्यक्रम स्पर्धा तसेच मतदार जनजागृतीबाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख व सुरेखा माने उपस्थित होते.

देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जनजागृतीचे मोठे कार्यही गणेश मंडळाच्या माध्यमातून होत आहे. युवा, दिव्यांग, शहरी नागरिक, स्थलांतरीत, ग्रामीण व आदिवासी नागरिक, तृतीयपंथी, तसेच महिला यांना मतदान प्रकियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळांनी स्वीप कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. नवमतदारांची तसेच सर्व स्तरातील मतदारांची नोंदणी वाढविणेसाठी जनजागरुकता करून त्यांना निवडणुक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी गणेश मंडळाचा स्वीप कार्यक्रमातील सहभाग महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी स्वीप कार्यकमाची संकल्पना, कार्यक्रमाचे स्वरूप, सहभाग, सजगता, उददीष्टे सांगितली. तसेच उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

स्पर्धेचा उद्देश
→ नागरिकांना नावनोंदणी व मतदानाचे महत्तव समजावून सांगणे.
→ 18 वर्ष पुर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार नोंदणी करिता सजग करणे
→ महिला त्यांच्या मतदानांच्या हक्कविषयी जागृत करणे
→ जेष्ठ नागरिक, दिव्यांग, वंचित घटक, हे लोकशाहीचा अमुल्य घटक आहे याची त्यांना जाणीव करून देणे
स्पर्धेची थीम

मतदार नोंदणीचे वाढविणे प्रत्येक मत अमुल्य आहे (मतदानाचे महत्व) नैतिक मतदान कोव्हिड 19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर शासकीय नियमांचे पालन करुन सर्व स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत तसेच, स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या गणेश मंडळास 25 जानेवारी 2022 रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे अशी माहिती मा. जिल्हाधिकारी यांनी दिली.