पुणे: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांमधील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे, ३१ मे २०२१: जिल्हाच्या ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांमधील रुग्णांच्या बिलांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करून त्याबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी ज्यादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

या तपासणीबाबतचा दैनंदिन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे शेखर शेटें, जिल्हा कोषागार अधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रविंद्र चव्हाण आणि उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी त्याचे तंतोतंत पालन करावे,असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

सर्व देयकांचे लेखापरिक्षण हे रुग्ण डिसचार्ज होण्यापूर्वी करावयाचे आहे. त्यामुळे संबंधित हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क ठेवून प्रत्येक रुग्णाचे देयक अंतिम करणेपूर्वीच प्री ऑडीट अर्थात पुर्वलेखापरीक्षण करण्याची दक्षता घेण्यात यावी. यापूर्वी करण्यात आलेल्या लेखापरीक्षणांत दर्शविण्यात आलेली वसूली तसेच यापुढे होणारी वसूली संबंधित रुग्णांस परत केली किंवा नाही याबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी लेखापरिक्षण पथक तसेच संबंधित तहसिलदार व गट विकास अधिकारी यांची राहील,असेही सांगण्यात आले आहे.