December 10, 2025

Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन

पुणे, १० डिसेंबर २०२५: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अर्धवट आणि निकृष्ट नियोजन केलेल्या बीआरटी मार्गाविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वडगावशेरी काँग्रेस ब्लॉकचे उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या पुढाकाराने नागरिकांनी अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या बीआरटी डिव्हायडरची प्रत्यक्ष आरती करून पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनाचा निषेध नोंदवला.

गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस पक्ष आणि स्थानिक नागरिक सातत्याने पालिका व पीएमपीएमएलला पत्रव्यवहार करून तक्रारी मांडत आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय विश्रांतवाडी परिसरातील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.

बीआरटी मार्गावरील अंधुक डिव्हायडर रात्री वाहनचालकांना दिसत नसल्याने गेल्या काही महिन्यांत २० ते २५ गंभीर अपघात झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली. अनेक फोरव्हिलर थेट डिव्हायडरवर आदळून मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी ही रचना तातडीने हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सचिन भोसले म्हणाले, “अर्धवट बीआरटी मार्ग तात्काळ हटवावा. डिव्हायडरवर योग्य लाईटिंग व रिफ्लेक्टर्स बसवावेत. नागरिकांचे प्राण धोक्यात घालणारे हे नियोजन असह्य आहे. पुढील काही दिवसांत कारवाई न झाल्यास आम्ही मोठे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.”

या अनोख्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अनिकेत गंगावणे, खंडू लांडगे, नंदू राक्षे, आनंद कांबळे, सनी राव, हितेश पाटोळे, भारत देवकुळे आदी मान्यवर सहभागी झाले.