लोणावळ्यात भुशी धरणात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू; २४ तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश

लोणावळा , १२ जुलै २०२२ : लोणावळ्यात वर्षाविहारसाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक एका १९ वर्षीय युवकाचा सोमवारी दुपारी भुशी धरणात बुडाल्याची घटना घडली. शिवदुर्ग रेस्कू पथकाच्या सदस्यांनी या पर्यटकाचा मृतदेह तब्बल २४ तासांनंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

साहिल सरोज (रा. मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. साहिल आणि त्याच्या ग्रुपचे सुमारे 250 पेक्षा अधिक सहकारी पाच बसेसने सोमवारी लोणावळा व खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. सोमवारी दुपारी सर्व सहकारी हे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेले होते. यावेळी धबधब्याच्या मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून येताना साहिलचे पाण्यात नियंत्रण सुटल्याने तो वाहत जाऊन पुढे काही अंतरावर भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्यावरून सुमारे २५ ते ३० फुट उंचीवरून खाली वाहत जाऊन भुशी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये वाहून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत स्थानिकांच्या मदतीने साहिलचा शोध सुरु केला आहे. तसेच शोध कार्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. रात्री साडेसात वाजेपर्यंत शोध घेतल्यानंतर मोहिम थांबविण्यात आली होती. आज (दि.११) सकाळपासून पुन्हा शिवदुर्ग रेस्कू पथकातील प्रणय अंबुरे, प्रविण देशमुख, अजय शेलार, समीर जोशी, ओंकार पडवळ, आयुष वर्तक, महेश मसने, राजेंद्र कडु, कुणाल कडु, रोहीत वर्तक, सागर कुंभार, सुनिल गायकवाड यांनी शोधमोहीम राबवत पाण्यातून साहिलचा मृतदेह बाहेर काढला.