पुणे: सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

पुणे दि. १०/०६/२०२१: चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र या महिन्यांतील सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील 28 लाख 55 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडील थकबाकी सद्यस्थितीत 1359 कोटी 4 लाखांवर गेली आहे. यामध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (12,97,225)– 735 कोटी 95 लाख, सातारा (3,16,820)– 77 कोटी 73 लाख, सोलापूर (4,35,210)– 188 कोटी 48, सांगली (3,21,150)– 121 कोटी 41 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (4,84,770)- 235 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संचारबंदी शिथील करण्यात आल्याने या केंद्रांमध्ये जाऊन वीज बिल भरण्याची सोय ग्राहकांना उपलब्ध झाली आहेत. सोबतच या जून महिन्यामध्ये सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.