पुणे: ईएमआरसी’ चा माहितीपट देशात दुसरा, ‘विज्ञान प्रसार’ आयोजित चित्रपट महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बाजी

पुणे,दि.१७- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान प्रसार’ या संस्थेतर्फे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ‘विज्ञान चित्रपट महोत्सव’ ही संकल्पना घेत देशपातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ व १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाईन पध्दतीने ही स्पर्धा पार पडली. रुपये पन्नास हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ईएमआरसी’ केंद्राने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. डॉ. कमला सोहोनी या विज्ञान विषयात केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे.

या महितीपटाचे दिग्दर्शन ‘ईएमआरसी’चे संचालक डॉ.समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शक व संकलन मिलिंद पाटील यांचे आहे; आणि संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे. इतर सहाय्यकांमध्ये:
कॅमेरा: अप्पा चिंचवडे, ध्वनी राम जाधव व प्रदीप भोसले, सेट निर्मिती राजेश देशमुख आणि सहाय्यक म्हणून सिलास .

“या महितीपटाच्या निमित्ताने डॉ. कमला सोहोनी यांचे भारतासाठीचे योगदान सर्वांसमोर आले आहे. ‘ईएमआरसी’ ने केलेले हे काम कौतुकास्पद आहे.” प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

“शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ आणि माझे सहकारी यांनी एकत्रित काम करून अत्यंत थोड्या अवधीत ह्या फिल्म साठी उत्तम काम केले आहे!”
-डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, संचालक, ईएमआरसी