पिंपरी चिंचवड, ८ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी पवना नदी सुमारे २४.४० किलोमीटर लांबीची असून तिच्या स्वच्छतेसाठी, पूर नियंत्रणासाठी आणि जैवविविधतेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेमार्फत एच.सी.पी. डिझाईन अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी संपूर्ण नदीचे सर्वेक्षण करून प्रदूषण कमी करण्यासाठी व पूर व्यवस्थापनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पाचा हायड्रोलॉजी आणि हायड्रॉलिक्स अहवाल सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आला आहे.
महानगरपालिकेने पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्रासाठी १० डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर एसइएसी-३ आणि एसइआयएए या राज्यस्तरीय समित्यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या. अखेर ७ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत एसइआयएए समितीने पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला पर्यावरण ना हरकत दाखला मंजूर केला आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की राज्य व केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नदीकाठाचे संरक्षण, जैवविविधतेचा विकास, जलचर आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास निर्माण होणार असून, पवना नदीचे संपूर्ण स्वरूप पर्यावरणपूरक पद्धतीने पुनरुज्जीवित होणार आहे.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!