September 20, 2025

Pune: चतु:शृंगी मंदिरात नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण तयारी

पुणे, १९ सप्टेंबर २०२५ : शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता चतु:शृंगी मंदिर ट्रस्टतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे औद्योगिक निर्देशक श्रीकांत अनगळ यांनी दिली. परिषदेला श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, नरेंद्र अनगळ, सुहास सदाशिव, सुहास प्रभाकर तसेच विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.

विश्वस्त नंदकुमार अनगळ यांनी सांगितले की, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता मंदिर व्यवस्थापक रविंद्र अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होईल. मंगलस्नान, पंचामृत, रुद्राभिषेकासह देवीची षोडशोपचार महापूजा करून महावस्त्र अर्पण केले जाईल. या पूजा विधींचे पौराहित्य श्रीराम नारायण कानडे गुरूजी करणार आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवक, पोलिस तसेच निमलष्करी दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रस्टतर्फे कार्डियक ॲम्बुलन्स, २४ तास चार डॉक्टर व सपोर्ट स्टाफ उपलब्ध राहणार आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबवले जाणार असून, आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत दिली जाणार आहेत, अशी माहिती कार्यकारी नरेंद्र अनगळ यांनी दिली.

नवरात्रोत्सव कार्यक्रम ठळक वैशिष्ट्ये

दररोज सकाळी १० व रात्री ८ वाजता महाआरती

पारंपरिक वाद्य व शंखनादाचा गजर

१ ऑक्टोबर रोजी सायं. ७ वाजता नवचंडी होम

२ ऑक्टोबर रोजी दसऱ्यादिवशी सिमोल्लंघन पालखी सोहळा