पुणे: चार उपनगरांच्या पाणी पुरवठ्यासाठी पावणे तीन कोटीचा खर्च

पुणे, ८ जुलै २०२२: महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तसेच हडपसर भागात पाण्याची टंचाई असल्याने यापैकी चार उपनगरांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी २ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, त्यासाठीच्या निविदांना आज स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पाणी पुरवठ्याची यंत्रणा अपुरी असल्याने व नव्या बांधकामांमुळे वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पाणी देणे अशक्य होत आहे. विहिरी, कॅनॉल, बोअरच्या किंवा टँकरच्या माध्यमातून या गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काम केले जाणार आहे, पण त्याची अजून प्रक्रिया असल्याने इतर पर्यायांवरच येथील नागरिक अवलंबून आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभागांमध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या ९७ लाख २१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम जाधव वॉटर सप्लायर यास देण्यात आले आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या धायरी व इतर भागात टँकरने पाणी देण्यासाठी ३९ लाख ९९ हजार रुपयांची निविदा मंजूर केली, याठिकाणी श्री. राजा कंस्ट्रक्शन या ठेकेदाराकडून पाणी पुरविले जाणार आहे.

कचरा डेपोमुळे भूगर्भातील पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याने उरुळी देवाची, फुरसुंगी, शेवाळवाडी या भागात महापालिकेकडून टँकरने पाणी पुरविले जाते, यासाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यात एन. वाय. शिवरकर या ठेकेदाराचा ९६ लाख ८८ हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. तर आंबेगाव खुर्द व इतर भागात टँकरने पाणी देण्यासाठी मे. गुजर वॉटर सर्व्हिस यांची ४९ लाख ८९ हजार रुपयांची निविदा मान्य केली.