पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे आभासी चलनात आठ कोटी ३० लाखांची खंडणीची मागणी, छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी

पुणे, ४/१२/२०२२: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन आभासी चलनातील खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाकाडे खंडणी स्वरुपात ६० बिटकाॅईन मागितले असून ६० बिटकाॅईनची किंमत आठ कोटी ३० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत एका बांधकाम व्यावसायिक कंपनीतील अधिकारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ईमेलद्वारे खंडणी मागणाऱ्या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला बांधकाम व्यावयायिक कंपनीत विपणन अधिकारी आहेत. गेल्या आठवड्यात बांधकाम कंपनीच्या इमेल खात्यावर अज्ञााताने इमेल पाठविला. इमेल करणाऱ्या आरोपीने कंपनीचे अध्यक्षांची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. छायाचित्रे प्रसारित करत नाही. बदनामीला सामाेरे जायचे नसेल तर ६० बिटकाॅइन खंडणी स्वरुपात द्यावे लागतील, अशी धमकी आरोपीने इमेलद्वारे दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. सायबर पोलिसांनी तक्रार अर्जाची पाहणी केली. संबंधित गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. बी. जाधव तपास करत आहेत.

एका बिटकाॅइनची किंमत १३ लाख ८४ हजार

बांधकाम व्यावसायिकाकडे आरोपीने खंडणी स्वरुपात ६० बिटकाॅइनची मागणी केली आहे. बाजारभावानुसार एका बिटकाॅइनची किंमत १३ लाख ८४ हजार २७ रुपये आहे.