पुणे: खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव, गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने केला पर्दाफाश

पुणे, ३०/११/२०२२:गोळीबार झाल्याचा खोटा बनाव करून एकाला सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखणार्‍या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात 80 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी व बनावट कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असीफ ईस्माईल खान (33, कोनार्क पुरम सोसायटी, कोंढवा खुर्द), फर्याज पठाण, समीर मेहबुब शेख, शहाबाद मेहबुब खान यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष थोरात या सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाने फिर्याद दिली आहे

कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञाताने आमच्यावर गोळीबार केल्याचा बनाव असीफ खान आणि त्याच्या साथीदारांनी व्यक्त केला होता. त्यामध्ये पोलिसांनी असीफ याला चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्याने फिर्यादी संतोष थोरात याच्यावर संशय व्यक्त केला होता. याच फायरिंगच्या अनुषंगाने युनिट 5 चे अधिकारी कोंढवा पोलिस ठाण्याबरोबर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व संबंधीत तांत्रीक तपास केल्यानंतर असीफ व त्याला दुजोरा देणार्‍या त्याच्या साथीदारांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हा बनाव केल्याचे स्पष्ठ झाले. त्यांनी हा प्रकार संतोष थोरात यांच्याकडे खंडणी 80 लाखांची उकळण्यासाठी व त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान त्यांनी फिर्यादी यांच्याकडून यापूर्वी 6 लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, राजस शेख, शहाजी गाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.