पुणे: कराड बँकेचा लोगो वापरल्याप्रकरणी सोनी लाईव्हवर गुन्हा

पुणे, ०६/०७/२०२१:  द हर्षद मेहता स्टोरी या वेब सिरीजमध्ये दि कराड अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेचा लोगो वापरून बदनामी केल्याच्या आरोपावरून सोनी लाईव्ह, अपलॉज इंटरटेनमेंट व युट्युब चॅनलवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी लाईव्ह चॅनलस अपलॉज इंटरटेनमेंट व दोन युट्युब चॅनलवर भारतीय दंड संहिता कलम ५००, ट्रेडमार्क अ‍ॅक्ट आणि आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र महादेव कांबळे (वय ५४, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि कराड अर्बन कोऑपरेटीव्ह बँक ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँक आहे. बँकेचा लोगो ट्रेडमार्क कायद्यानुसार नोंदणी करण्यात आलेला आहे. सोनी लाईव्ह अ‍ॅपवर स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागात बँकेचा लोगो वापरण्यात वापरण्यात आला आहे. सोनी लाईव्ह व अपलॉज इंटरटेनमेंट यांनी बेकायदा बँकेचा लोगो कॉपी करून त्याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला. हा लोगो बँकेच्या परवानगीशिवाय वापरला. त्यामुळे बँकेच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचली. नऊ ऑक्टोंबर २०२० रोजी ही वेबसिरीज प्रेक्षेपित झाली होती. त्याशिवाय हर्षद मेहता प्रकरणाशी काहीही संबंध नसताना बँकेचा लोगो वापरण्यात आला आहे. त्यामुळे बँकेला आर्थिक व सामाजिक मनस्तापाला समोरे जावे लागले.तसेच, या व्यतिरिक्त दोन युट्युब चॅनलने देखील बँकेचा लोगोचा व्हिडीओसाठी वापर केला असल्याचे दिसून आले आहे, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो सहकारनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

बँकेच्या वकील जयश्री नांगरे यांनी सांगितले, हर्षद मेहता वेबसिरीजमध्ये बँकेचा विनापरवाना लोगो वापरल्याचे दिसून आल्यानंतर जानेवारी महिन्यात सोनी लाईव्ह, अपलॉज एंटरटेनमेंट व इतरांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी या तक्रार अर्जावर चौकशी करून दोन जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे.