पुणे: खंडणीसाठी पाच जणांनी केले तीन महिलांचे अपहरण

पुणे, दि. २० जुलै २०२१:- वडीलांच्या उपचारासाठी व्याजाने रक्कम घेऊन तब्बल १ कोटी ४३ लाख परत केले असतानाही आणखी पैशासाठी तीन महिलांचे अपहरण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने सही केलेले धनादेशासह स्टँम्पवर सह्या घेत बेकायदेशिररित्या सावकारी करणाऱ्या चार महिलांसह एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केले. त्यांच्यावर अपहरण, खंडणी, बेकायदेशीर घरात प्रवेश, मारहाण, धमकाविणे, संगनमत करणे तसेच सावकारी कायदाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शगुफ्ता सैय्यद (वय ४६, रा. साळुंखे विहार, वानवडी), फरीदा युसुफ खान (वय ४२, रा. वानवडी ), आबीद शब्बीर साहा उर्फ डीजे (रा. खडकी), आसमा नईम सैय्यद (वय ३५, भवानी पेठ), शहनाझआसिफ शेख (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वैशाली वासुदेव कुलकर्णी (वय ४५, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०१४ ते जुलै २०२१ दरम्यान घडली.

वैशाली यांनी वडीलांच्या उपचारासाठी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजापोटी वैशाली आणि बहीण उज्वला डंबळ यांनी आरोपी शगुफ्ताला २९ लाख २३ हजार, फरीदाला ७८ लाख ३२ हजार, आसमाला २९ लाख ४ हजार, तर शहनाझला ६ लाख ६२ हजार असे एकूण १ कोटी ४३ लाख २३ हजार रूपये दिले होते. तरीही जून महिन्यात फरीदा खान हिने वैशाली व त्यांच्या आईला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून तिच्या राहत्या घरी नेले होते. तेथे त्यांना डांबून ठेवून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर फरीदाने व आबीदने ७ जुलैला वैशाली, त्यांच्या आईला व बहिणीला मार्केटयार्डात बोलावून घेतले. तेथे शिवाीगाळ करून हाताने मारहाण करून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसण्यास सांगून फिर्यादी वैशाली यांच्या विमाननगर येथील घरी नेले. तेथे त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून त्यांच्याकडून जबरदस्तीने कोऱ्या धनादेशासह स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या. आरोपी महिलांनी आमची पोलिस खात्यात चांगली ओळख आहे, आमचे नातेवाईक पोलिस खात्यात आहेत, त्यांच्यामार्फत तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.