September 11, 2025

Pune: गणेशोत्सवाची भव्यता, ऐतिहासिक ठेवा पाहून परदेशी नागरिक हरखले

पुणे, 29/08/2025: पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पेशवेकालीन त्रिशुंड गणपती मंदिर, ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन व इतिहास जाणून घेत, श्रीमंत भाऊ रंगारी भवनातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अनुभवतानाच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्यता, ऐतिहासिक ठेवा पाहून परदेशी पाहुणे हरखून गेले.

निमित्त होते, राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाउंडेशन व अमित फाटक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिव्हल अंतर्गत पुण्यात शिकणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकचे! महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सांस्कृतिक विभागाचे या महोत्सवाला विशेष सहकार्य लाभले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांसाठी हा हेरिटेज वॉक व गणपती दर्शनाचे आयोजन केले आहे.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, युगांडा, घाना, तुर्कीस्थान, कझाकिस्थान, भूतान, नेपाळ, म्यानमार आदी देशांतील जवळपास २०० नागरिक सहभागी झाले. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, उपसंचालक शमा पवार, फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले, समन्वयक महेश साने, कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले, चिन्मय वाघ, त्रिशुंड गणपती मंडळाचे सचिन पवार, सोहम पवार आदी उपस्थित होते.

दुपारी २ वाजता सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर येथून या हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. तत्पूर्वी याठिकाणी पारंपरिक पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेऊन मंदिराचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली. इटली येथील अभिनेत्री एना मारा यांनीही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत लक्ष वेधून घेतले. टाळ्यांची उत्स्फूर्त दाद देत अनेकांनी हा अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांत अन कॅमेरात साठवून घेतला.

ग्रामदैवत कसबा गणपतीचे उत्सव मंडपात दर्शन घेतल्यानंतर मूळ मंदिराविषयी माहिती घेतली. एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक पुनीत बालन यांनी परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन, तसेच ऐतिहासिक भाऊ रंगारी भवनाची माहिती घेत स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जाणून घेतली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची भव्यता अनुभवत, गर्दीतून मार्ग काढत परदेशी विद्यार्थ्यांनी बाप्पाची आरती केली.

गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मंडई ते स्वारगेट अशी मेट्रो सफारी घडवण्यात आली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. शुभारंभ लॉन्स येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने हेरिटेज वॉकची सांगता झाली.