पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी मोफत लसीकरण

पुणे,२६ मे २०२१: शहरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोफत लस दिली जाणार आहे. या रुग्णालयात दिवसाला १०० ते २०० डोस मोफत दिले जाणार आहेत, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महामारीच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. समाजहित व लोकसेवा या उद्देशाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे हितचिंतक, देणगीदार, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच रोटरी क्लब आणि इतरांनी दिलेल्या निधीतून गरजू व गरीब लोकांच्या लसीकरणासाठी “श्रीमंगेश व्हॅक्सिन फंड’ची निर्मिती केली जात आहे.

खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांत लसीचा एक डोस केंद्र सरकारकडून उपलब्ध होत आहे. त्यात अधिक आकारणी करून साधारण ९०० ते १२०० रुपयांपर्यंत एक लस देत आहेत. मात्र प्रति डोस किंमत देण्याइतकी आर्थिक स्थिती नसलेल्या रिक्षाचालक, घरकाम करणारे कर्मचारी, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोफत लस दिली जाणार आहे. इतरांना लस देऊन मिळणाऱ्या पैशातच या लसींची खरेदी होणार आहे. मंगेशकर रुग्णालयाला या उपक्रमातून एक रुपयाही मिळणार नाही, १८ ते ४४ वर्षांच्या व्यक्तीला मोफत लस मिळणार आहे यासाठी कोणतीही कागदपत्र देण्याची गरज नसल्याचेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.