October 27, 2025

पुणे: समाविष्ट गावांसाठी तातडीनं निधी द्यावा – नाना भानगिरे यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे, १९ डिसेंबर २०२४: शासनाकडून गेल्या सात वर्षात महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश केला आहे. मात्र, निधी अभावी या गावांचा विकास खुटंला असून महापालिकेकडून कोणतीही ठोस कामे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, महापालिकेने या गावांच्या विकासकामांसाठी तातडीनं निधी द्यावा तसेच गावांमधील कामांसाठी प्रस्तावित असलेल्या निधीचे इतरत्र वर्गीकरण करू नये अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातही मोठया प्रमाणात निधी प्रस्तावित करण्याची मागणी भानगिरे यांनी केली आहे.

भानगिरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शासनाने आता पर्यंत ३४ गावांचा महापालिकेत समावेश केला आहे. त्यानंता महापालिकेकडून गावातील विकासासाठी राज्य शासनाकडे दहा हजार कोटींच्या निधीची मागणी केली होती. हा निधी महापालिकेस मिळालेला नाही. मात्र, या निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या महापालिकेकडूनही गावांसाठी विशेष कामे केली जात नाहीत. महापालिकेच्या अंदाजपत्रकात शंभर ते दीडशे कोटींची तरतूद केली असून हे प्रकल्प या वर्षात होणार नसल्याने समाविष्ट केलेल्या गावांसाठीचा निधी पुणे शहरातील इतर प्रभागातील निधीसाठी वळवण्यात येत आहे. त्यामुळे गावांवर अन्याय होत असल्याची नाराजी भानगिरे यांनी व्यक्त केली आहे.

“या ३४ गावांसाठी महापालिकेने शासनाकडे १० हजार कोटींच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न करणार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.” – प्रमोद उर्फ नाना भानगिरे ( शहर प्रमुख, शिवसेना)