पाण्याच्या समस्येला वैतागलेल्या फुरसुंगीकरांनी फ्लेक्स लावून केला प्रशासनाचा निषेध

पुणे, १३ जुलै २०२२ : फुरसुंगी परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, गेले १२ दिवस या परिसरात पुण्याचे पाणी आलेले नाही. जे पाणी येते ते अतिशय गढूळ असल्याने पिण्यायोग्य नसते. या समस्येला वैतागलेल्या फुरसुंगीकरांनी ‘ काय तो महाप्रचंड टॅक्स…काय तो कचरा…काय ते गढूळ पाणी…’ अशा स्टाईल ‘ ने फ्लेक्स लावत महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

फुरसुंगी गाव नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाले आहे. मात्र याठिकाणी महापलिकेडून अपुऱ्या सुविधा पुरविल्या जात आहेत. असे असताना कर मात्र पुरेपूर वसूल केला जात आहे. गावात पूर्वीपासूनच कचऱ्याची समस्या होती आता खराब रस्ते आणि पाण्याची देखील समस्या भेडसावत आहे.
परिसरात पूर्वीपासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याची संख्या कमी झाली आहे. काही भागांत विहिरीमधील नळ कोंडाळयाने पाणीपुरवठा केला जातो. मात्र ते केवळ कालव्याला पाण्याचा विसर्ग असल्यावरच, अन्यथा परिसरात पाणीपुरवठा होत नाही. सध्या देखील १२ दिवसा पासून पिण्याचे पाणी येत नाही, आणि जे पाणी येते ते अतिशय गढूळ असते. याविरोधात स्थानिक नागरिक असलेले सचिन हरपळे, अजिंक्य ढमाळ, अमोल कापरे यांनी फ्लेक्स लावत निषेध व्यक्त केला आहे. तसेच परिसरात स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, ही अपेक्षाही व्यक्त केली आहे.