पुणे: गारवा हॉटेल मालकाच्या खुनाचा उलगडा; शेजारील हॉटेल मालकाने भाच्याच्या मदतीने दिली होती सुपारी

पुणे,२५ जुलै २०२१ – उरळी कांचन परिसरातील प्रसिद्ध गारवा हॉटेलमुळे शेजारील अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नसल्याने, या हॉटेल मालकाच्या भाचाने मामाच्या सहकार्याने एका सराईटला गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे पोलिस तपासातून उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. अविनाश अक्षय दाभाडे, करण विजय खडसे, प्रथमेश राजेंद्र कोलते, गणेश मधुकर माने, निखील मंगेश चौधरी, निलेश आरते अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.


आखाडे यांचा १८ जुलै रोजी तलवारीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रामदास यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासादरम्यान हॉटेल गारवा शेजारील हॉटेल अशोकाचे मालक जयवंत बाळासाहेब खेडकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याने मामाच्या सांगण्यावरून रामदास यांच्या खूनाची सुपारी दिल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे, निखील पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सौरभ उर्फ चिम्या याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ८ जणांच्या मदतीने प्लॅनिंग करून रामदास यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. याप्रकरणी फरारी असलेल्या सराईत निलेश आरते याच्यासह अल्पवयीनाला पोलिसांनी लातूरमध्ये १० ते १२ किलोमीटर प्रवास करून पकडले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस निरीक्षक राजू महानोर, दादाराजे पवार, अमित गोरे, गणेश सातपुते, राजू पुणेकर, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संतोष अंदुरे, संदीप धनवटे, सतीश सायकर, बाजीराव वीर, गणेश भापकर, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांनी केली.