पुणे: टाकीत पडून बालिकेचा मृत्यू, कात्रज भागाील घटना

पुणे, १२/११/२०२२: नियोजित गृहप्रकल्पाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अंशिका सुनील सहानी (वय २) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अंशिकाचे वडील सुनील (वय २७) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्यद दिली आहे. सहानी याने दिलेल्या फिर्यादीनुसार बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात चोरगे यांच्याकडून नियोजित गृहप्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. सुनील सहानी बांधकाम मजूर असून तो गृहप्रकल्पाच्या परिसरात कुटुंबीयांसह राहायला आहे.

अंशिका पाण्याच्या टाकीजवळ खेळत होती. त्या वेळी अंशिका तोल जाऊन टाकीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. टाकीला झाकण नसल्याचे लक्षात आले. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.