पुणे: भविष्यात कृषी पर्यटनाला चांगले दिवस- दीपक हरणे

पुणे, दि. 16 मे 2021: ” भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये एकांत व शांतता असलेल्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना मनःशांती उपलब्ध करून देणाऱ्या कृषी पर्यटनाला भविष्यात चांगले दिवस असतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले.

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट विभाग व रिटेल मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटनातील संधी या विषयावर आयोजित एक दिवसीय ॲानलाइन चर्चासत्रामध्ये हरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अर्जुन डोके, डॅा. नरसिंग गिरी, डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते. हरणे यांनी सर्वप्रथम जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या संकल्पनेबाबत माहिती देत जागतिक स्तरावरील कृषी व ग्रामीण पर्यटनाचे स्वरूप स्पष्ट केले.

त्याचबरोबर कृषी पर्यटनामधील संधीची माहिती देताना कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक घटक, शासकीय धोरणे, महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रे, कृषी पर्यटनासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करत असलेले कार्य, प्रशिक्षण कार्यक्रम, विपणन कौशल्य इत्यादी घटकांवर उपस्थित विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. चर्चासत्रानंतर विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटना विषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंका निरसन केले.

या ॲानलाइन चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. नरसिंग गिरी यांनी केले, तर डॅा. अर्जुन डोके यांनी आभार मानले.
या चर्चासत्रामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील पर्यटन पदवी अभ्यासक्रम, कृषी पर्यटन प्रमाणपत्र अभ्यासक्रम व रिटेल मॅनेजमेंट विभाग तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर व वाघिरे महाविद्यालय सासवड मधील पर्यटन अभ्यासक्रमाचे सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.