पुणे: सैनिकांच्या गावातील नेटवर्क समस्येची राज्यशासनाकडून दखल

पुणे, २१ जुलै २०२१: सैनिकांचे गाव असलेल्या पिंगोरी गावातील मोबाईल नेटवर्क समस्येची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून, लवकरच त्याबाबत योग्य उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती दत्ताञय फडतरे यांनी दिली.
शहराच्या हददीपासुन काही अंतरावर असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील ‘पिंगोरी’ हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र गावात कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे टाॅवर  व नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.


ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी फडतरे यांनी राज्याचे मुख्यमंञी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती . त्या पञाची दखल घेतली असल्याचे पञ फडतरे यांना नुकतेच मिळाले आहे. ते तीन वर्षांपासून सैनिकांच्या गावामध्ये मोबाईल टाॅवर मंजुर होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. यापुर्वी ,त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पञव्यवहार केला आहे.परंतु ,आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याने त्यांनी राज्याच्या मुख्यमंञ्यांशी पञव्यवहार केला होता. त्याला सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन हे प्रकरण कक्ष आधिकारी, माहीती तंञज्ञान विभागाकडुन पुढे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


याबाबत फडतरे म्हणाले,” गावातील जवळपास प्रत्येक घरातील एक जवान भारतीय लष्करात जाऊन देशाची सेवा करत आहे. लष्करातील जवानांना आपल्या कुटुबांशी साधा संवाद ही साधता येत नाही. एकीकडे डिजिटल इंडीया, कँशलेस व्यवहार, डिजीटल  ग्रामपंचायती,  बायोमँट्रीक राशन व्यवस्था ,डिजीटल साक्षरता , आॅनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे या गावात मोबाईल टॉवर्स नाहीत. या भागातील डोंगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावातील मुलांनी रेंजसाठी डोंगर माथ्यावर जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच गावात टॉवर्स उभारणीसाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले पाहिजे.”