पुणे, १३ जुलै २०२५: पर्यावरणपूरक आणि कार्बन उत्सर्जनमुक्त वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि निरामय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ११५ विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. हा उपक्रम मिसाळ यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, सचिव डॉ. राधिका इनामदार, उद्योजक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, अॅड. मिहीर प्रभूदेसाई, सतीश पवार, सुधीर काळकर आणि जयंत किराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “ग्रीन मोबिलिटीसाठी शासन सायकलिंगला चालना देत असून मेट्रो, ई-बस खरेदी आणि इलेक्ट्रिक वाहन वापरास प्राधान्य देत आहे. या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण, इंधन बचत आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जात आहे. आपल्याला कार्बन-न्यूट्रल भविष्य घडवायचे असल्यास अशी पायाभूत सुविधा आवश्यक आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “आज आपण विद्यार्थिनींना सायकल देत आहोत, म्हणजेच आपण उद्याच्या पर्यावरणपूरक भारताची दिशा ठरवत आहोत. सायकल ही केवळ आरोग्यवर्धक नाही, तर पर्यावरण रक्षणाचे एक प्रभावी साधन आहे.”
सायकल वाटपासाठी प्रायोजकत्व बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड यांनी केले.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल