पुणे: पालकमंत्री साहेब मला न्याय द्या, सासरच्या नावाने सुसाईड नोट लिहून तरूणाची आत्महत्या

पुणे, २३/०८/२०२१: मला व माझ्या कुटूंबियांना सासरच्या मंडळींनी खूप त्रास दिला आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री साहेब मला न्याय द्या, अशी सुसाईड नोट लिहून तरूणाने काल राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोखलेनगरमध्ये घडली आहे. निखील धोत्रे (वय २८, रा. गोखलेनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील इमारतींच्या सेंटरिंगचे काम करीत होता. मागील काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीसह सासरचे लोक निखीलला मनस्ताप देत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय सासरच्यांनी त्याच्याकडून १ लाख ३० हजार रूपये घेतल्यामुळे निखील कर्जबाजरी झाल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यानुसार काल निखीलने चिठ्ठीत सासरच्या मंडळींची नावे लिहून आत्महत्या केली.

मला व माझ्या कुटूंबाला सासरच्यांनी खूप त्रास दिला आहे. माननीय पालकमंत्री यांनी सर्वांना कठोर शिक्षा करावी. आई तू काळजी करू नकोस, माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे. अशाप्रकारे सुसाईड नोट लिहून निखील धोत्रे यांनी गळफास घेउन आत्महत्या केली आहे.