पुणे: दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

पुणे, ०४/०१/२०२३: शहरात कोयते उगारुन तोडफोड, दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरोधात कठोर कारवाई करुन त्यांना जरब बसवायला पाहिजे, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले.


स्वारगेट पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर  उपस्थित होते.पुणे  शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. अनेकजण नोकरी, रोजगाराच्या शोधात शहरात येत असून त्यांची माहिती पोलिसांकडे नाही. शहरात गुन्हेगारी घटना वाढत आहेत. गुन्हेगारांना जरब बसावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यास खऱ्या अर्थाने त्यांना जरब बसेल, असे पाटील यांनी नमूद केले.


शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस तसेच सरकारी वकिलांनी प्रयत्न करायला हवेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. गंभीर गुन्हे करणाऱ्या सराइतांना जामीन मिळता कामा नये. गुन्हा सिद्ध करुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुणे शहरातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या बालकांसाठी बालस्नेही कक्षाची निर्मिती देशभरातील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिला तसेच बालकांच्या तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करायला हवे, असे त्यांनी सांगितले.